Wednesday, 15 July 2020

चीन सीमेवर बुलडाणा जिल्ह्याचे जवान सतीश पेहरे शहीद; उद्या येणार पार्थिव.

गलवान खोर्‍यात चीनच्या सीमेवर बुलडाणा जिल्ह्याचा जवान शहीद

चिखली ( तालुका प्रतिनिधी)

गलवान खोर्‍यात चीनच्या सीमेवर बुलडाणा जिल्ह्याचा जवान शहीद झाल्याची वार्ता आज, 15 जुलै रोजी सकाळी नऊला जिल्ह्यात धडकली अन् अमोनावासियांना धक्काच बसला. सतीश सुरेश पेहरे (27) असे या जवानाचे नाव असून, ते आठ वर्षांपासून भारतीय सैन्यात कार्यरत होते. काल रात्री सीमेवर सुरू असलेल्या पुलाच्या कामादरम्यान अपघात होऊन ते शहीद झाले. आज सकाळी सैन्याकडून अधिकृत माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली. दरम्यान, पार्थिव उद्या, 16 जुलैला रात्रीपर्यंत गावात येणार असून, परवा सकाळी अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती सैन्य दलाच्या स्थानिक सूत्रांनी दिली.

पेहरे कुटुंब अमोन्याचे असून, शेतीनिमित्त वरूड बुद्रूकला सध्या राहते.   वरूड बुद्रूक जालना जिल्ह्यात येत असल्याने जालना आणि बुलडाणा येथील सैन्य दलाचे अधिकारी दुपारी गावात धडकले आणि त्यांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. वरूड बुद्रूक विदर्भ- मराठवाडा सीमेवर आहे. सतीश यांचे वडील सुरेश पेहरे (60) यांना आज सकाळी सैन्याकडून कॉल आला आणि त्यांना सतीश हे शहीद झाल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर हे कुटुंबच नव्हे तर अवघे गाव सुन्न झाले. सुरेश पेहरे यांना तीन मुले असून, तिघेही  सैन्यात आहेत हे विशेष. या तीन भावांना एक बहीण आहे. सतीश यांचे लग्न तीन वर्षांपूर्वी मेहकर येथील जया यांच्यासोबत झाले असून, त्यांना दीड वर्षाचा अर्णव नावाचा मुलगा आहे. सुरेश पेहरे यांचा व्यवसाय शेती आणि कुंभारकाम आहे. कुंभार काम करताना मूर्ती, मडके घडवतात त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या तीनही मुलांना चांगले शिक्षण देऊन सैन्याच्या सेवेसाठी पाठवले. सतीश यांची आई घरकाम करते व शेतीव्यवसायात मदत करते. 2012 मध्ये सतीश यांनी सैन्यदलात प्रवेश मिळवला. आठ वर्षांची त्यांची सेवा झाली असून, लॉकडाऊनमधध्ये ते दोन महिने घरी होते. त्यानंतर दीड महिन्यापूर्वी ते पुन्हा ड्यूटीवर गेले. त्यानंतर दीर्घकाळ त्यांचा फोन आला नाही आणि लागलाही नाही.
काल सकाळी मात्र त्यांचा कॉल आला आणि त्यांनी पत्नीशी काही वेळ संवादही साधला. त्यानंतर आज सकाळी थेट त्यांच्या शहीद होण्याची वार्ताच कुटुंबियांच्या कानावर आली.  सतीश यांच्या घराचे काम सुरू होते. हे कुटुंब नव्या घरात राहण्याची स्वप्नं सजवत असतानाच ही दुर्दैवी बातमी कानावर आली. अवघ्या गावात सतीश यांच्यासह तीन भावांचे चांगले नाव घेतले जाते. सतीश यांच्या शहीद होण्यामुळे अमोनाच नाही तर वरूडवरही शोककळा पसरली आहे.

No comments:

Post a Comment

डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ

  डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ लोणार - प्रणव वराडे उपमुख्यमंत्री कार्यालय ...